मी तिला विचारलं,
तिनं लाजुन होय म्हटल,
सोनेरी गिरक्या घेत,मनात गाणं नाचत सुटलं.
तुम्ही म्हणाल,यात विशेष काय घडलं?
त्यालाच कळेल,ज्याचं असं मन जडलं.
तुमचं लग्नं ठरवून झालं?
कोवळेपन हरवून झालं?
देणार काय? घेणार काय?
हुंडा किती?बिंडा किती?
याचा मान,त्याचा पान
सगळा मामला रोख होता,
व्यवहार भलताच चोख होता....
हे सगळं तुम्हाला सांगुन तरी कळणार कसं?
असलं गाणं तुमच्याकडे वळणार कसं?
ते सगळं जाऊ द्या,मला माझं गाणं गाऊ द्या...
मी तिला विचारलं,
तिनं लाजुन होय म्हटलं,
सोनेरी गिरक्या घेत,मनात गाणं नाचत सुटलं,
त्या धुंदीत,त्या नशेत,प्रत्येक क्षण जागवला,
इराण्याच्या हॉटेलात मस्कापाव मागवला.
तेवढी सुध्दा ऐपत नव्हती,असली चैन झेपत नव्हती.
देवच तेंव्हा असे वाली,खिशातलं पाकीट खाली.
त्या दिवशी रस्त्याने सिंहासारखा होतो हिंडत,
पोलिससुध्दा माझ्याकडे आदराने होते बघत.
जीव असा तरंगतो तेंव्हा भय असणार कुठलं?
मी तिला विचारलं,
तिनं लाजुन होय म्हटलं,
सोनेरी गिरक्या घेत,मनात गाणं नाचत सुटलं.
मग एक दिवस,
चंद्र,सुर्य,तारे,वारे,
सगळं मनात साठवलं,
आणी थरथरणार्या हातांनी,
तिला प्रेमपत्र पाठवलं.
आधिच माझं अक्षर कापरं,
त्या दिवशी आधिकचं कापलं.
रक्ताचं तर सोडाच राव,
हातामधलं पेनसुद्धा होतं तापलं.
पत्र पोस्टात टाकलंआणि आठवलं,
पाकिटावर तिकिट नव्हतं लावलं
पत्रं तिला पोचलं तरीसुद्धा
तुम्हाला सांगतो,
पोष्ट्मन तो प्रेमात पडला असला पहिजे,
माझ्यासारखाच त्याचासुद्धा कुठेतरी जीव जडला असला पाहिजे.
मनाचा फांदीवर,
गुणी पाखरू येऊन बसलं
मी तिला विचारलं,
तिनं लाजुन होय म्हटलं
सोनेरी गिरक्या घेत,मनात गाणं नाचत सुटलं.
पुढे मग तिच्याशीच लग्नं झालं,मुलं झाली,
संगोपन बिंगोपन करुन बिरुन शिकवली
मी तिच्या प्रेमा खातर नोकरीसुद्धा टिकवली
तसा प्रत्येकजण नेक असतो.फरक मात्र एक असतो.
कोणता फरक?
मी तिला विचारलं,
तिनं लाजुन होय म्हटलं,
सोनेरी गिरक्या घेत,मनात गाणं नाचत सुटलं.
कवी – मंगेश पाडगांवकर.
No comments:
Post a Comment